सरस्वती टॉकीज येथील धोकादायक संरक्षक भिंत हटविली…

204
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नगरसेवक यतीन खोत, पालिका प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेबाबत नागरिकांतून समाधान…

मालवण, ता. १९ : शहरातील भरड भागातील सरस्वती टॉकीज येथे रस्त्यालगतची धोकादायक स्थितीतील संरक्षक भिंतीचा काही भाग हटविण्याची कार्यवाही पालिकेच्यावतीने करण्यात आली. रस्त्याच्या बाजूने झुकलेल्या अवस्थेत असणार्‍या या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला असता तर पादचारी, वाहन चालक तसेच विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेत नगरसेवक यतीन खोत यांच्या पुढाकारातून पालिका प्रशासनाने ही भिंत हटविली.
भरड भागात असलेले सरस्वती टॉकीज गेली अनेक वर्षे बंद स्थितीत आहे. या टॉकीजची संरक्षक भिंत रस्त्यालगत आहे. ती खूप जीर्ण होऊन रस्त्याच्या बाजूने झुकली होती. या संरक्षक भिंतीला तडे गेल्याने ती केव्हाही रस्त्यावर कोसळण्याची भीती निर्माण होती. सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत अधिकच झुकल्याने धोकादायक बनली होती.
सरस्वती टॉकीजच्या परिसरात खासगी शिकवणीसाठी येणार्‍या शालेय मुलांचा वावर असतो तसेच या मुख्य रस्त्यावरून दिवसभर पादचारी, वाहनचालकांची ये-जा सुरू असल्याने ही भिंत कोसळल्यास अपघात.घडण्याची शक्यता होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी संभाव्य धोका लक्षात घेत पालिकेच्या कर्मचार्‍यांना ही संरक्षक भिंत काढण्याची सूचना केली. त्यानुसार आज सायंकाळी पालिका कर्मचार्‍यांनी ही धोकादायक संरक्षक भिंत जमीनदोस्त केली. नगरसेवक यतीन खोत, पालिका प्रशासनाने दाखविलेल्या कर्तव्य दक्षतेबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

\