काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निष्क्रिय असल्यानेच जिल्ह्यातील काँग्रेस संपली…

683
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बाळू अंधारी यांचा आरोप ; सक्षम जिल्हाध्यक्षांसाठी पक्षश्रेष्ठींचे वेधले लक्ष…

मालवण, ता. २० : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे हे निष्क्रिय आहेत. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात असलेली काँग्रेस संपली अशी टीका काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळू अंधारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान शिवसेनेने काँग्रेसला विश्वासात न घेतल्यानेच त्यांचा पराभव झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोरेश्वर कॉम्प्लेक्स येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण तळवडेकर, चंदन पांगे, प्रभाकर हेदूळकर, अरविंद मोंडकर, पल्लवी तारी, योगेश्वर कुर्ले, सरदार ताजर, दिलीप तळगावकर, श्रीहरी खवणेकर आदी उपस्थित होते.
श्री. अंधारी म्हणाले, बाळा गावडे हे जिल्हाध्यक्ष होऊन वर्षभराचा कालावधी उलटून गेला. मात्र या कालावधीत त्यांच्या हातून एकही विकासकामाचे उदघाटन झाले नाही. सत्तेत असूनही ते काँग्रेसच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात आणू शकले नाही. जिल्हाध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांच्याकडून काही प्रयत्न न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ते जिल्हाध्यक्ष व्हावेत यासाठी आम्हीच प्रयत्न केले मात्र आता आम्हाला पश्चाताप होत आहे.
जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली असून ती कशी भरून निघेल यासाठी जिल्हाध्यक्षांकडून प्रयत्न होणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी केवळ सावंतवाडी, कणकवली, देवगड या तीन तालुक्याची कमिटी नियुक्त केली. जिल्ह्यात ते केवळ चार निष्क्रिय माणसांना घेऊन फिरत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांच्या जिल्हाध्यक्षांबरोबर बैठक घ्यायला हवी होती. मात्र अशी कोणतीही चर्चा त्यांनी केली नाही. ते केवळ इन्सुलीत ठाण मांडून बसले. यातही काँग्रेसची एकही सीट न आल्याने सुफडा साफ झाला. यावरून जिल्ह्यात अस्तित्वच नसलेले जिल्हाध्यक्ष दिसून आल्याची टीकाही श्री. अंधारी यांनी केली.
जिल्हाध्यक्ष म्हणून गावडे यांनी ताठ भूमिका घेत आपल्या पक्षाच्या मंत्र्याशी संपर्क साधत विकासकामांचा आराखडा बनवायला हवा होता. नियोजन करायला हवे होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळ देणारा सक्षम जिल्हाध्यक्ष द्यावा यासाठी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यात आले असल्याचेही श्री. अंधारी यांनी यावेळी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेतले नाही. चिंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस महेंद्र मांजरेकर यांनी तिकीट मागितले. मात्र शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारले. परिणामी त्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलकडून निवडणूक लढवीत विजय मिळविला. त्यामुळेच चिंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याचे श्री. अंधारी यांनी सांगितले.

\