जिल्हा परिषदेच्या जागेतच छत्रपतींच्या पुतळ्याचे स्थलांतर होणार…

183
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संदेश पारकर ः हायवे समस्या सुटल्याखेरीज उड्डाणपूल सुरू करून देणार नाही…

कणकवली, ता.४ ः महामार्गालगतच्या जिल्हा परिषद बांधकामच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर होईल. तसेच कणकवली शहरातील हायवेच्या समस्या सुटल्याखेरीज उड्डाणपुलावरून आम्ही वाहतूक सुरू करू देणार नाही असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज दिला.
श्री.पारकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, महामार्गावरील तेलीआळी चौकातील छत्रपतींचा पुतळा हलवून तो गटारावर बसविण्यासाठी हायवे ठेकेदाराने धावपळ सुरू केली होती. मात्र आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. आम्हाला छत्रपतींचे भव्यदिव्य स्मारक करायचे आहे. त्यासाठी महामार्गालगत जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध आहे. तेथील इमारतीचे निर्लेखन झाल्यानंतर ही जागा पुतळ्यासाठी उपलब्ध होईल. या प्रक्रिये दरम्यान एक दोन शिवजयंती झाली तरी चालेल. पण आम्ही गटारावर पुतळ्याचे स्थलांतर करू देणार नाही.
पारकर म्हणाले, छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जिल्हा परिषद बांधकामची जागा निश्‍चित झाली आहे. तर पालकमंत्री व खासदार यांनी या स्मारकाच्या निधीची तरतूदही केली आहे. याखेरीज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे कार्यालय निर्लेखन करण्यास मान्यता मिळविण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घेतली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्थलांतरणानंतर तेथे स्मारक उभारणीसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या स्मारकाजवळ छत्रपतींची शौर्यगाथा व भव्य स्मारक करत तेथे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागाची इमारत निर्लेखन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनीदेखील मान्यता दिल्याची माहिती पारकर यांनी दिली.
पारकर म्हणाले, शहरातील उड्डाणपूल पूर्ण झाल्याने त्यावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन हायवे कडून सुरू आहे. मात्र शहरात हायवेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. अनेकांना अजून मोबदला मिळालेला नाही. तसेच आरओडब्ल्यू लाइन देखील निश्‍चित झालेली नाही. त्यामुळे शहरातील हायवेच्या समस्या सुटल्याखेरीज आम्ही उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही

\